प्रकरण २ : युरोपीय वसाहतवाद
प्र. (१) वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा.
उत्तर : अठराव्या शतकात पुढील विविध कारणांमुळे वसाहतवाद उदयास आला –
(अ) औद्योगिक क्रांती :
(१) औदयोगिक क्रांतीने उत्पादन यंत्रांच्या साहाय्याने होऊ लागल्यामुळे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले.
(२) अंतर्गत बाजारपेठेत हे उत्पादन खपणे शक्य नसल्याने, त्यांना ते अन्य देशांत विकणे आवश्यक होते.
(३) युरोपीय देशांना हक्काच्या बाजारपेठा मिळण्याच्या गरजेतून वसाहतवादाला गती मिळाली.
(ब) कच्च्या मालाची गरज :
(१) बाजारपेठेतील स्पर्धेमुळे मालाच्या किमती कमी ठेवण्याची गरज होती.
(२) त्यासाठी कच्चा माल कमी किमतीत मिळवणे गरजेचे होते.
(३) त्यासाठी स्वतःची मक्तेदारी असणाऱ्या वसाहती मिळवणे गरजेचे होते..
(क) अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक :
(१) औदयोगिक क्रांतीमुळे युरोपातील भांडवलदारवर्ग अधिकच श्रीमंत झाला..
(२) हा वर्ग आपले अतिरिक्त भांडवल सुरक्षित बाजारपेठांमध्ये गुंतवू लागला.
(३) आर्थिकदृष्ट्या अप्रगत वसाहती सुरक्षित असल्याने वसाहतवादाला चालना मिळाली.
(ड) खनिज साठे :
(१) आशिया आफ्रिका खंडांत सोने, चांदी, हिरे, कोळसा, खनिजे यांच्या नैसर्गिक खाणी होत्या.
(२) युरोपीय व्यापाऱ्यांना या संपत्तीचे आकर्षण वाटू लागल्याने वसाहतवाद वाढीस लागला.
(ई) भौगोलिक महत्त्व :
(१) आशिया आफ्रिका खंडांतील काही प्रदेश वाहतुकीच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी असल्याचे युरोपीय राष्ट्रांच्या लक्षात आले.
(२) माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान-निकोबार यांसारखे मोक्याचे प्रदेश इंग्लंडने जिंकले.
(३) या महत्त्वामुळे अन्य युरोपीय राष्ट्रांनीही आशिया आफ्रिका या खंडांत आपल्या वसाहती स्थापन केल्या.
(फ) मजुरांची उपलब्धता :
(१) युरोपीय राष्ट्रांना कारखान्यांतून काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व स्वस्त मजुरांची गरज होती.
(२) या गरजेतूनच गुलामगिरी वाढीस लागली.
(ग) वंशश्रेष्ठत्वाची गरज :
(१) आशिया-आफ्रिकेतील जनता अज्ञानी असून त्यांना सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आपली आहे, अशी भूमिका युरोपीय वसाहतवादी राष्ट्रांनी घेतली.
(२) या भूमिकेतूनच वसाहतींमध्ये ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. (टीप: व्यवसायातील प्रगतीचे कोणतेही पाच मुद्दे स्पष्टीकरणासह लिहिणे अपेक्षित आहे.)
(२) अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाची कारणे स्पष्ट करा. उत्तर : इंग्लंड विरुद्ध अमेरिकन वसाहती यांच्यात झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाची कारणे पुढीलप्रमाणे
(अ) वसाहतींवरील निर्बंध :
(१) इंग्लंडने वसाहतींसाठी जलवाहतुकीसंबंधीचा कायदा करून वसाहतींची नाकेबंदी केली.
(२) या कायदयाने वसाहतींमध्ये मालाची वाहतूक करण्याची मक्तेदारी फक्त इंग्लंडमधील कंपन्यांनाच दिली गेली.
(ब) स्टॅम्प अॅक्ट :
(१) इंग्लडने वसाहतींसाठी १७६५ साली ‘स्टॅम्प अॅक्ट’ हा कायदा संमत करून महत्त्वाच्या वस्तूंवर कर लादले.
(२) या नव्या करामुळे वस्तूंच्या किमती वाढल्या. त्यामुळे या कराविरुद्ध वसाहतीतील जनतेत असंतोष निर्माण झाला.
(क) बोस्टनचा गोळीबार :
(१) मॅसॅच्युसेट्समधील बोस्टन येथे वसाहतींतील लोक व ब्रिटिश सैनिक यांच्यात ५ मार्च १७७० रोजी चकमक झडली. (२) या चकमकीत ब्रिटिश सैन्याने केलेल्या गोळीबारात वसाहतींतील काही लोक ठार झाले. यामुळे बोस्टनमध्ये असंतोष वाढला.
(ड) बोस्टन टी पार्टी घटना :
(१) १७७३ साली चहावर जकात कर लावण्याच्या इंग्लंडच्या निर्णयाने वसाहतवाले संतप्त झाले.
(२) बोस्टन बंदरात स्थानिक जनतेने जहाजातील चहाच्या पेट्या समुद्रात फेकून या कायदयाला विरोध केला.
(ई) फिलाडेल्फिया परिषद
(१) इंग्लंडने लादलेले जाचक कर व बंधने यांमुळे निर्माण झालेल्या असंतोषातून वसाहतीत एकजुटीची भावना निर्माण झाली.
(२) १७७४ मध्ये फिलाडेल्फिया येथे वसाहतींच्या भरलेल्या अधिवेशनात त्यांनी ब्रिटिश मालाच्या आयात-निर्यातीला विरोध केला.
(३) ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकून वसाहतींनी इंग्लंडच्या वसाहतवादाविरुद्ध लढा पुकारला.
प्र. (३) स्पेनने अमेरिकेत आपल्या वसाहती कशा निर्माण केल्या?
उत्तर : औदयोगिक क्रांतीनंतर युरोपीय राष्ट्रांत वसाहती स्थापन करण्यासाठी सुरू झाली. स्पेनने अमेरिकेत पुढीलप्रमाणे आपल्या वसाहती स्थापन केल्या
(१) स्पेनने प्रथम उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको जिंकले. अमेरिकन भूमीव स्पेनला ऊस आणि तंबाखू यांचे उत्पादन घ्यायचे होते.
(२) शेती कसण्यासाठी त्यांनी आफ्रिकेतून गुलाम आणले.
(३) पेरू, मेक्सिको, व्हेनेझुएला या ठिकाणी स्पेनला सोन्या-चांदीचे साठे सापडले.
(४) यामुळे स्पेनने शेतीपेक्षा सोने मिळवण्यावर अधिक लक्ष दिले.
(५) दक्षिण अमेरिकेत संपूर्ण किनारपट्टीवर त्यांनी सत्ता प्रस्थापित केली.
(६) दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्निया हा प्रदेश जिंकला.
(७) शेतीबरोबरच खाणींमधून अफाट खनिज संपत्ती मिळू लागली.
(८) या वसाहतींचा कारभार सांभाळण्यासाठी स्पेनने गव्हर्नरांच्या नेमणुका केल्या. स्पेनचा राजा हा वसाहतींचा सत्ताधीश होता.
(९) ‘कौन्सिल ऑफ दि इंडिज’ या संघटनेद्वारे सत्ता राबवण्यात येऊ लागली.
(१०) अमेरिकेतील या वसाहतींमधून कच्चा माल स्पेनला जात असे व तेथून पक्क माल वसाहतींत विक्रीसाठी येत असे. या व्यापारात स्पेनच्या राजाला मोठा फायदा होत असे.स्पेनची भरभराट पाहून हॉलंड, फ्रान्स यांनीही अमेरिकेत आपल्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली.