प्रकरण १२: बदलता भारत भाग २
प्र. (१) पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाकडून कोणत्या सुविधा सुरू केल्या आहेत ?
उत्तर :
अधिकाधिक विकसित होत जाणाऱ्या पर्यटन क्षेत्रामुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. यासाठी पर्यटन विभागाकडून अधिकाधिक पर्यटक आकर्षित व्हावेत म्हणून पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत :-
(१) भारत सरकारच्या गृह, पर्यटन आणि विदेश मंत्रालय यांनी एकत्रित ‘ई-व्हिसा’ सुविधा सुरू केली. यात ई-व्यावसायिक व्हिसा, ई-मेडिकल व्हिसा या सुविधांचा समावेश आहे.
(२) २०१६ पासून परकीय पर्यटकांसाठी १० परकीय भाषांमध्ये माहिती देण्याची सुविधा २४ तास उपलब्ध केलेली आहे. ही माहिती त्यांना मोबाइलवर दिली जाते.
(३) १३६३ या दूरध्वनी क्रमांकावर पर्यटन मंत्रालयाच्या वतीने माहिती मिळू शकते.
(४) विविध प्रकारचे पर्यटन, चित्रपट महोत्सव, खेळ इत्यादी माहिती पर्यटन मंत्रालयामार्फत पर्यटकांना दिली जाते.
(५) पर्यटकांशी कसे वागावे, शिष्टाचार इत्यादींचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्यात आल्या आहेत.
(६) पर्यटकांना राहण्याची – खाण्याची उत्तम व्यवस्था व्हावी, म्हणून हॉटेल्स बांधण्यात आली आहेत.
(७) पर्यटन व्यवसाय वाढावा व अधिकाधिक पर्यटक आकर्षित व्हावेत यांसाठी शासनाकडून ‘अतुल्य भारत’ ही प्रसिद्धी मोहीम राबवण्यात येत आहे.
(८) पर्यटकांना भारताची ओळख व्हावी यासाठी डिस्कव्हरी, हिस्टरी अशा जागतिक वाहिन्यांवरून भारतातील ऐतिहासिक, नैसर्गिक ठिकाणे दाखवली जातात.
(९) ‘स्वदेश दर्शन’ यात्रेअंतर्गत भारतात १३ प्रकारच्या यात्रा आयोजित केल्या जातात. या सुविधेद्वारा भारतातील धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे पाहण्याची सुविधा पर्यटकांना मिळाली आहे.
(१०) प्राचीन तीर्थक्षेत्रे व आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची ९५ स्थळे ‘प्रसाद’ योजनेद्वारा पाहण्यास मिळतात.
प्र. (२) भारत सरकारचे क्रीडा धोरण स्पष्ट करा?
उत्तर :
खेळात वाढत चाललेली स्पर्धा, अर्थकारण, तंत्रज्ञानाचा वापर या अशा अनेक गोष्टींमुळे प्रत्येक देश खेळांकडे लक्ष देऊ लागला आहे. क्रीडाविषयक आपले धोरण आखतो आहे. भारत सरकारच्या क्रीडा धोरणात पुढील बाबींचा समावेश आहे :-
(१) २००१मध्ये भारत सरकारने आपले क्रीडा धोरण घोषित केले. खेळांचा विस्तार करणे, खेळांना पूरक वातावरण निर्माण करणे, खेळांना व खेळाडूंना मदत करणे इत्यादी गोष्टी या क्रीडा धोरणाची वैशिष्ट्ये आहे.
(२) २०११ मध्ये भारताने ‘या आणि खेळा’ ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत दिल्ली येथे पाच क्रीडा संकुले उपलब्ध करून देण्यात आली.
(३) येथे येणाऱ्या मुलांसाठी SAI च्या (स्पोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया) तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शनाची सोय करण्यात आली.
(४) मणिपूरमध्ये ‘नॅशनल स्पोर्टस् युनिव्हर्सिटी’ची स्थापना करून खेळांचे मार्गदर्शन, व्यवस्थापन व खेळांचे मानसशास्त्र यांची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला.
(५) २०१८-१९ पासून खेळांचे प्रशिक्षण व मानसशास्त्र यांचे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू केले गेले.
(६) खेळांना व्यापक जनाधार देणे आणि खेळांमध्ये उत्तम दर्जा गाठणे या उद्दिष्टपूर्तीसाठी २०१७ पासून भारत सरकारने ‘खेलो इंडिया’ ही योजना अमलात आणली.
(७) खेळांच्या विकासासाठी राष्ट्रीय विकास कोष स्थापन करण्यात आला. या कोपाला मदत करणाऱ्याला आयकरात १००% सूट देण्यात येते.
(८) खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलरत्न’सारखे पुरस्कार दिले जातात. शिवाय रोख बक्षिसेही दिली जातात.
(९) आंतरराष्ट्रीय खेळांत प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना नोकऱ्या दिल्या जातात.
(१०) विजेत्या खेळाडूंना निवृत्तिवेतन दिले जाते.
खेळांच्या विकासासाठी भारत सरकारने सर्वांगीण असे हे राष्ट्रीय धोरण निश्चित केले आहे. या धोरणामुळे खेळांना मदत व प्रोत्साहन मिळते.