प्रकरण २ : यूरोपीय वसाहतवाद
प्र. (१) यूरोपीय वसाहतवाद
उत्तर :
(१) प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे, या प्रक्रियेला ‘वसाहतवाद’ असे म्हणतात.
(२) वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक प्रकार आहे.
(३) अज्ञात भूमीचा शोध घेऊन त्यावर आपली सत्ता स्थापन करणे, तेथील सोन्याच्या व खनिजांच्या खाणींचा शोध घेणे, आपल्या धर्माचा तेथे प्रसार करणे या बाबी वसाहतवादाचीच वेगवेगळी रूपे आहेत.
(४) वसाहतींमधील कच्चा माल आपल्या देशात नेणे व पक्का माल वसाहतीत विक्री करणे, हक्काच्या बाजारपेठा म्हणून त्यांचा उपयोग करणे ही वसाहतवादाची लक्षणे आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवाद वाढीस लागला.
प्र. (२) अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध
उत्तर:
(१) १७७४ मध्ये फिलाडेल्फिया येथे भरलेल्या अधिवेशनात वसाहतींनी ब्रिटिशांविरुद्ध लढा पुकारला.
(२) ४ जुलै १७७६ मध्ये तेरा वसाहतींनी एकत्र येऊन ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ प्रसिद्ध केला.
(३) इंग्लंडविरुद्ध वसाहतींचा स्वातंत्र्यलढा चालू झाला. जॉर्ज वॉशिंग्टन याच्या नेतृत्त्वाखाली वसाहतींनी हा लढा दिला.
(४) या लढ्यात फ्रान्स व स्पेन यांनी वसाहतींच्या बाजूने भाग घेतला.
(५) अखेरीस सॅराटोगा येथील लढाईत ब्रिटिश सैन्याचा पराभव होऊन मै लॉर्ड कॉर्नवॉलिस शरण आला आणि अमेरिका स्वतंत्र झाली.
प्र. (३) अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या देणग्या
उत्तर:
अमेरिकन स्वातंत्र्ययुधाने जगाला पुढील विचारांच्या देणग्या दिल्या.
(१) अन्यायाविरुद्ध बंड करण्याचा व स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक मानवसमूहाला असतो, ही गोष्ट प्रस्थापित झाली.
(२) जीवन जगणे, स्वातंत्र्य व आनंद मिळवणे हे मानवाचे तीन निसर्गदत्त हक्क आहेत.
(३) मानवाचे हे निसर्गदत्त हक्क नाकारणाऱ्या राज्यकर्त्यांविरुद्ध लढण्याचा जनतेला हक्क असतो, हे सिद्ध झाले.
(४) ‘राजाविना राज्य’ ही अमेरिकेने जगाला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे.