प्रकरण ६ : वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
प्र. (१) जहाल विचारसरणी
उत्तर :
(१) स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व्यापक जनआंदोलन उभे करून अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे, या विचारांच्या राष्ट्रीय सभेतील कार्यकर्त्यांच्या गटाला ‘जहालवादी’ असे म्हणतात.
(२) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात ‘आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा’ हा वाद सुरू झाला. स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल, ही जहाल गटाची विचारसरणी होती.
(३) आपले घर आपण आधी ताब्यात घेऊ, मग हव्या त्या सुधारणा करू असे जहालवाद्यांचे म्हणणे होते.
(४) स्वातंत्र्य मिळवणे हे मवाळवादी व जहालवादी या दोन्ही गटांचे ध्येय एकच असले, तरी दोन्हींच्या कार्यपद्धतींबाबत त्यांच्यात मतभेद होते. अर्ज-विनंत्या अगर भाषणे करून इंग्रजी सत्ता बघणार नाही, असे जहालवादयांचे मत होते.
(५) मवाळवादयांच्या सनदशीर मार्गावर जहालवादयांचा विश्वास नव्हता.
प्र. (२) आझाद हिंद सेना
उत्तर :
(१) दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशांत जे भारतीय सैनिक पकडले होते, त्यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
(२) रासबिहारी बोस यांच्या आमंत्रणावरून सुभाषचंद्र बोस जपानला गेले व त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
(३) त्यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने आराकानचा प्रदेश व आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली.
(४) अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढले.
प्र. (३) उमाजी नाईक यांचा जाहीरनामा
उत्तर:
इंग्रजी राज्य बुडणार, याची खात्री असलेल्या उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध काढलेल्या जाहीरनाम्यात पुढील बाबी होत्या –
(१) युरोपीय लोक, लष्करी शिपाई वा अधिकारी जेथे सापडतील तेथे त्यांना ठार करावे.
(२) हे काम जे उत्कृष्टपणे करतील त्यांना रोख बक्षिसे, इनाम, जहागीर नव्या सरकारकडून मिळेल.
(३) इंग्रजी राज्यात ज्यांची वतने, हक्क व मिळकती बुडाल्या असतील; त्यांना त्यांचे हक्क नवीन सरकारकडून मिळण्याची संधी आलेली आहे. तिचा उपयोग करून इंग्रजांच्या नोकऱ्या सोडून बाहेर पडावे…
(४) इंग्रजांचे नियम पाळणाऱ्यास नवीन सरकारकडून शिक्षा होईल. युरोपियनांचे बंगले जाळावेत. सरकारी तिजोऱ्या लुटाव्यात..
(५) लुटीचा पैसा माफ केला जाईल. सरकारला वसूल भरू नये.
प्र. (४) राणीचा जाहीरनामा
उत्तर:
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध थंड झाल्यावर इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भरतीयांसाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यांना पुढील आश्वासने दिली –
(१) भारतीय प्रजाजनांमध्ये वंश, धर्म, जात, जन्मस्थान इत्यादींवरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
(२) गुणवत्तेच्या आधारेच नोकच्या दिल्या जातील.
(३) धार्मिक बाबतीत ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करणार नाही.
(४) संस्थानिकांशी केलेल्या करारांचे पालन केले जाईल व कोणत्याही कारणाने सस्थाने खालसा केली जाणार नाहीत.