प्रकरण ४: वसाहतवाद आणि मराठे
प्र. (१) पोर्तुगीज- मराठे तह
उत्तर :
१० फेब्रुवारी १६७० रोजी पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात तह झाला.या तहात पुढील अटी मान्य करण्यात आल्या –
(१) पोर्तुगीज व मराठे या उभयतांनी परस्परांची जहाजे लुटली असल्यास, त्याबद्दल योग्य ती नुकसानभरपाई एकमेकांना दयावी.
(२) मुघलांना जहाजाच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या सवलती मराठ्यांनाही मिळाव्यात.
(३) एकमेकांच्या हद्दीत कोणीही किल्ले बांधू नयेत.
(४) सिद्दीला स्वराज्याविरुद्ध पोर्तुगिजांनी मदत करू नये.
(५) ठाणे जिल्ह्यातील रामनगरच्या सरहद्दीत किल्ले बांधू नयेत.
प्र. (२) पानिपतचे तिसरे युद्ध
उत्तर :
इसवी सन १७५९ मध्ये अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशहा अब्दाली याने भारतावर चौथी स्वारी केली.
(१) अफगाणांना अद्दल घडवण्यासाठी आणि त्यांना भारतातून कायमचे घालवण्यासाठी सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली मराठी फौजा उत्तरेकडे रवाना झाल्या.
(२) १४ जानेवारी १७६१ रोजी मराठे आणि अब्दाली यांची गाठ यमुना नदीच्या तीरावर पानिपत येथे पडली.
(३) पानिपत येथे अब्दाली-मराठे यांच्यात जे घनघोर युद्ध झाले, त्या युद्धाला पानिपतचे तिसरे युद्ध’ असे म्हणतात.
(४) या युद्धात सदाशिवरावभाऊ, विश्वासराव, अनेक सरदार व एक लाखाच्यावर सैन्य मारले गेले. मराठ्यांचा दारुण पराभव झाला.
प्र. (३) पोर्तुगिजांनी शिवरायांचे केलेले गुणगान
उत्तर :
पोर्तुगीज इतिहासकार कास्मो-द-ग्वार्द याने त्याच्या ग्रंथात शिवरायांच्या धाडसाचे व प्रजाहितदक्षपणाचे वर्णन केले आहे.
(१) “शिवरायांचा दरारा एवढा होता की त्यांना आव्हान देण्याचे धाडस क्वचित कोणी करीत असे” असे ग्वार्द म्हणतो.
(२) शिवराय निःपक्षपातीपणे एखादयाच्या शौर्याचे कौतुक करून बक्षिसी देत तसेच गुन्हेगाराला शिक्षा करीत असत. ते प्रजेची काळजी करीत असत, तिच्यावर प्रेम करीत म्हणूनच प्रजाही त्यांच्यावर प्रेम करीत असे. शिवराय हे सर्वश्रेष्ठ राजे होते, असे स्वाद लिहितो.
(३) एका पोर्तुगीज गव्हर्नरने शिवरायांच्या युद्धकौशल्याचे गुणगान केले आहे. तो म्हणतो की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य भीती निर्माण करणारे होते. ”
(४) शत्रूसंबंधीची त्यांची धोरणे शांततेच्या काळातही भीतिदायक होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य भयमुक्त झाले, असेही या पोर्तुगीज गव्हर्नरने शिवरायांचे वर्णन केले आहे.