पाठ १) सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय
प्र ९ . पुढील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात ते साकारण स्पष्ट करा
(१) सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे.
उत्तर : या विधानाशी मी असहमत आहे.
कारणे : (१) सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये Microeconomics असे म्हणतात. इंग्रजीतील Micro या शब्दाची उत्पत्ती मूळ ग्रीक शब्द Mikros या शब्दापासून झाली आहे. Mikros या शब्दाचा मराठी अर्थ अत्यंत लहान किंवा एक-दशलक्षांश भाग असा होतो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील अत्यंत सूक्ष्म घटकांचा अभ्यास करते.
(२) सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था,वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादींचा अभ्यास केला जातो.
(३) सूक्ष्म अर्थशास्त्रात एखादा उपभोक्ता महत्तम समाधान कशा प्रकारे प्राप्त करतो व एखादा उत्पादक किंवा उत्पादनसंस्था / पेढी महत्तम नफा कशा प्रकारे प्राप्त करते याचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जात नाही. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे समुच्चयात्मक स्वरूपाचे नसून व्यक्तिगत स्वरूपाचे असते.
म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद नसून मर्यादित आहे.
(२) स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो.
उत्तर : या विधानाशी मी असहमत आहे.
कारणे : (१) स्थूल अर्थशास्त्रात विशिष्ट ग्राहक, वैयक्तिक मागणी, विशिष्ट विक्रेता, वैयक्तिक पुरवठा, विशिष्ट वस्तूच्या किमतीचे निर्धारण इत्यादी वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात नाही.
(२) सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट ग्राहकाच्या महत्तम उपयोगिता प्राप्तीचे आणि विशिष्ट उत्पादकाच्या महत्तम नफा प्राप्तीचे विश्लेषण केले जाते.
(३) परंतु स्थूल अर्थशास्त्रात समग्र आर्थिक चलांचा, त्यांच्यातील फलनात्मक संबंधाचा व परस्परावलंबनाचा तसेच त्यांच्या निर्धारणाचा, त्यांच्यातील बदलांचा व चढउतारांच्या कारणांचा अभ्यास केला जातो. म्हणून स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही, तर समग्र घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो.
(३) स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे.
उत्तर : या विधानाशी मी सहमत आहे.
कारणे : (१) स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे.
(२) स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी, समग्र पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, , वैयक्तिक उत्पन्न इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो.
(३) स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलावर भर देते. सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलावर भर देते.
(४) स्थूल अर्थशास्त्र राशी किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर करते. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे.
(४) सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो.
उत्तर : या विधानाशी मी सहमत आहे. कारणे : (१) सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदा., विशिष्ट पेढीचा अभ्यास.
(२) वैयक्तिक आर्थिक घटकांच्या अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते.
(३) विभाजनानंतर प्रत्येक विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो.
म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो.
(५) सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते.
उत्तर : या विधानाशी मी असहमत आहे.
कारणे : (१) उत्पन्न सिद्धांताचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रात न होता स्थूल अर्थशास्त्रात होतो.
(२) वस्तूंच्या व सेवांच्या किमती या त्यांच्या मागणीच्या व
पुरवठ्याच्या समतोलावून कशा प्रकारे ठरतात याचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो.
(३) भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या चार उत्पादन घटकांच्या किमती (मोबदले) म्हणजेच अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे त्यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या समतोलातून कशा प्रकारे ठरतात, याचाही सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो.
म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले न जाता किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते.
(६) स्थूल अर्थशास्त्रात आंशिक समतोलाचे विश्लेषण केले जाते.
उत्तर : या विधानाशी मी असहमत आहे.
कारणे : (१) स्थूल अर्थशास्त्र समतोलाच्या संदर्भात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करते. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र हे सर्वसाधारण समतोलाच्या विश्लेषणाशी संबंधित आहे.
(२) स्थूल अर्थशास्त्र एकाच वेळेस अनेक समग्रलक्षी आर्थिक चले, त्यांचे आंतरसंबंध, परस्परावलंबन इत्यादींचा अभ्यास करते.
(३) स्थूल अर्थशास्त्र हे सर्व घटक इतर सर्वाशी संबंधित असतात या गृहीतकाचा वापर करते. उदा., स्थूल अर्थशास्त्र हे एकूण मागणी व एकूण पुरवठा यांतील समतोल हा केवळ सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित करीत नाही, तर त्याच वेळी एकूण उत्पन्न पातळी व एकूण रोजगार पातळीही कशी निश्चित करतो याचे स्पष्टीकरण करते..
म्हणून स्थूल अर्थशास्त्रात आंशिक समतोलाचे विश्लेषण केले जात नाही, तर समग्र समतोलाचे विश्लेषण केले जाते.